आझादी का अमृत महोत्सव” निमित्त 

विविध कायदेविषयक कार्यक्रमांचे आयोजन 

नांदेड (जिमाका) 1 :-  “आझादी का अमृत महोत्सव” अंतर्गत वेगवेगळया ग्रामपंचायत, शाळा, बाजारपेठ येथे कायदेविषयक शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या तालुका विधी सेवा समितीमार्फत हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमात पथनाटयाच्या माध्यमातून जनजागृतीचे केली जात आहे. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांचे निर्देशानुसार आणि प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष श्रीकांत आणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

या कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड आणि तालुका विधी सेवा समितीच्यावतीने 1 हजार 460 गावामध्ये 10 लाख 13 हजार 383 लोकांना कायदेविषयक माहिती देण्यात आली. तसेच 683 गावांमध्ये कायदेविषयक शिबीर घेऊन 2 लाख 43 हजार 930 लोकांना विविध कायदेविषयक माहिती देण्यात आली आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव राजेंद्र रोटे हे परिश्रम घेत आहेत. त्यांनी नांदेड तालुक्यातील 70 ग्रामपंचायती व गावांना भेटी दिल्या असून गावातील लोकांना प्रत्यक्ष भेटून कायदेविषयक शिबिराद्वारे माहिती दिली आहे. 

तसेच नांदेड जिल्हा कारागृह येथे कैद्यांना त्यांचे अधिकार व हक्काबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी जिल्हा न्यायाधीश-1 नांदेड, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव आर. एस. रोटे, रिटेनर लॉयर नय्युमखान पठाण आदी उपस्थित होते. तसेच निळा आणि आलेगाव येथेही कायदेविषयक शिबिर संपन्न झाले. या शिबिरासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. एस. रोटे यांनी कायदयाच्या अज्ञानातून न्यायालयातील खटले निर्माण होतात. त्यामुळे नागरिकांनी कायदयाविषयी जागृत राहिले पाहिजे असे सांगितले. या कार्यक्रमासाठी दिवाणी न्यायाधीश व. स्तर संजय बी. डिगे हे उपस्थित होते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे रिटेनर लॉयर सुभाष बेंडे, सरपंच संघटनेचे अध्यक्ष दासराव हंबर्डे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

00000