परभणी, दि.1 (जिमाका) :- जिल्ह्यात सद्यस्थितीत 46 आधार नोंदणी केंद्र चालु असून आधार क्रमांकाशी मोबाईल क्रमांक लिंक करणे, आधार कार्डवरील नाव, जन्मतारखेत दुरुस्ती करणे इत्यादी कामे केली जातात. तरी आधार नोंदणी व दुरुस्तीसाठी युआयडीएआयने निश्चित केलेल्या दरानुसार नागरिकांनी शुल्काची पावती केंद्र चालकाकडून हस्तगत करुन केवळ पावतीवर मुद्रीत शुल्क अदा करावे. पावतीवरील शुल्कापेक्षा जास्त शुल्क आकारणाऱ्या आधार केंद्रचालकाची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे करावी. असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. आधार नोंदणी व दुरुस्तीसाठी युआयडीएआयने दर निश्चित केले आहेत. यामध्ये आधार नोंदणी व शुन्य ते पाच वर्षानंतरचे अनिवार्य बायोमेट्रीक अद्यावतीकरण नि:शुल्क असून फिंगर प्रिंट व फोटो अद्यावतीकरण 100 रुपये, पत्ता व जन्मतारीख आणि मोबाईल क्रमांक अद्यावतीकरण 50 रुपये आणि आधारकार्ड डाऊनलोड आणि कलर प्रिंटसाठी 30 रुपये शुल्क आकारण्यात येत असतात. तरी नागरिकांनी आधार संबंधित कामासाठी निश्चित केलेल्या दरानुसारच शुल्काची रक्कम अदा करावी. असे उपजिल्हाधिकारी (सामान्य) तथा नोडल अधिकारी, परभणी यांनी कळविले आहे. -*-*-*-*-