परभणी, दि.1 (जिमाका) :- वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत तांडावस्तीतील कामे जलदगतीने होवून सदर योजना प्रभावीपणे राबविण्याकरीता व तांडावस्तीच्या समतोल विकास होण्याकरीता दक्षता घेवून व हाती घ्यावयाची काम समितीमार्फत संबंधित जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आ लेल्या समितीप्रमाणे प्राप्त झालेले प्रस्ताव समिती समोर ठेवून मंजूरी प्रदान करण्यासाठी व त्यानुसार प्राप्त झालेल्या शासन निर्णयानुसार समितीमधील अध्यक्ष, सदस्यांची समितीमध्ये निवड करण्यासाठी दि.3 नोव्हेंबर 2021 पर्यंत सहायक आयुक्त, समाजकल्याण परभणी या कार्यालयात परिपुर्ण प्रस्ताव तीन प्रतीत सादर करावेत. असे आवाहन समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त गिता गुट्टे यांनी केले आहे. जिल्ह्यातील बंजारा बहुल समाजातील व्यक्तीच्या अध्यक्षतेखाली शासन निर्णयान्वये नव्याने समिती गठीत करण्यात येणार असून समितीमध्ये निवड केल्याप्रमाणे बंजारा बहुल समाजातील अध्यक्ष, सदस्यांची निवड व पदनाम पुढीलप्रमाणे आहेत. संबंधित जिल्ह्यातील बंजारा समाजातील एक व्यक्ती अध्यक्ष, विमुक्त जाती प्रवर्गातील एक व्यक्ती सदस्य, भटक्या जमाती प्रवर्गातील एक व्यक्ती सदस्य, विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील एक महिला सदस्य तर संबंधित जिल्ह्याचे समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त सदस्य सचिव राहतील. प्रस्ताव मुदतीत प्राप्त न झाल्यास कुठल्याही प्रकारचा विचार न करता ग्राह्य धरण्यात येणार नाही. असेही कळविण्यात आले आहे. -*-*-*-*-