प् परभणी, दि. 11 (जिमाका) :- जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या संघटनांनी पुकारलेल्या राज्यव्यापी संपाच्या अनुषंगाने दि.9 नोव्हेंबर 2021 रोजीपासुन उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, परभणी यांनी जिल्ह्यातील प्रवासी वाहतुक सुरळीत होण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. तरी या आपात्कालीन कालावधीमध्ये अवाजवी भाडे अथवा प्रवाशांची अडवणूक केली जावू नये यासाठी यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अवाजवी भाडे आकारणी केल्यास प्रवाशांनी ऑनलाईन तक्रार mvdcomplaint.enf2@gmail.com अथवा dyrto.22mh@gmail.com या ई-मेलवर नोंदवावी. असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अश्विनी स्वामी यांनी केले आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत आपत्कालीन मदत कक्ष स्थापन करण्यात आलेला असून पोलिस विभाग, एसटी महामंडळ व आरटीओ कार्यालयातील अधिकाऱ्यांची बस डेपोनिहाय संपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य महामंडळाच्याअंतर्गत येणाऱ्या एसटी बस डेपो, बसस्थानकामध्ये प्रवाशांची वाहतुक करण्यासाठी खाजगी बस ऑपरेटर्सशी संपर्क साधून प्रवासी बसेस उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. संपाच्या कालावधीमध्ये नागरिकांना गैरसोय टाळण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या अधिसुचनेप्रमाणे महाराष्ट्र शासनाने सर्व खाजगी बसेस, स्कुल बसेस कंपनीच्या मालकीच्या बसेस व मालवाहु वाहने तसेच खाजगी वाहने यांना प्रवासी वाहतुक करण्यास मान्यता दिली आहे. त्याप्रमाणे रोज साधारणत: 100 ते 200 वाहने उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. प्रत्येक बस डेपोनिहाय या कार्यालयाचे अधिकारी उपलब्ध असून प्रवासी वाहतुक सुरळीत होईल यासाठी प्रयत्न करत आहेत. प्रवाशांनी तक्रारीसाठी दु. 022-62426666 या वर संपर्क साधावा. असेही कळविण्यात आले आहे. -*-*-*-*-