परभणी, दि.22 (जिमाका) :- जायकवाडी पाटबंधारे विभाग क्र.2 अंतर्गत मध्यम प्रकल्प-2 व लघु प्रकल्प-22 या प्रकल्पाच्या जलाशय, मुख्य कालव्यावर असलेल्या उपसा सिंचन योजना आणि उच्च पातळी बंधारे, को.प.बंधारे, अधिसुचित नदी व नालेवरील उपसा सिंचनाच्या योजनांना पुर्वी जलसंपदा विभागाकडून उपसा सिंचनाच्या पाणी परवानग्या देण्यात आल्या आहेत. तरी सर्व परवानाधारकांना जायकवाडी पाटबंधारे विभागाकडून कालबाह्य परवानगीचे नुतनीकरण करुन घेण्याबाबत नोटीस देण्यात आल्या आहेत. अशा उपसा सिंचन पाणी परवानगीची मुदत संपलेल्या परवानाधारकांनी पंधरा दिवसाच्या आत परवानगीचे नुतनीकरण करावे अन्यथा आपला परवाना रद्द केला जाईल. असे आवाहन जायकवाडी पाटबंधारे विभाग क्र-2 परभणीचे कार्यकारी अभियंता एम.एस.जोशी यांनी केले आहे. पुर्वी सिंचनासाठी दिलेल्या पाणी परवानग्यांची मुदत संपलेली आहे. असे असूनसुध्दा मुदत संपलेल्या पाणी परवागीचे नुतनीकरण करण्यात आले नाही अशा परवानाधारकांकडे जलसंपदा खात्याची पाणीपट्टीची रक्कम मोठ्या प्रमाणात थकीत आहे. मुदत संपलेल्या थकबाकीदारांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मुदत संपलेल्या पाणी परवानगीचे ठिबक, तुषार सिंचन पध्दतीने नुतनीकरण करुन घेतल्याने उपसा सिंचनाचा पाणी वापर कमी होवून पाण्याची मोठी बचत होईल. तसेच थकबाकीदार उपसा सिंचनधारकांकडील पुर्वीची पाणीपट्टीची थकबाकी वसून होवून शासनाच्या महसूलामध्ये वाढ होण्यास मदत होईल. त्यामुळे उपसा सिंचनधारक शेतकऱ्यांनी उपसा सिंचन पाणी परवानगीचे ठिबक व तुषार सिंचन पध्दतीने नुतनीकरण करुन घ्यावे. असेही कळविण्यात आले आहे. -*-*-*-*-