परभणी, दि.23 (जिमाका) :- जिल्ह्यात खरीप हंगामातील पिकांची काढणी पुर्ण झालेली असून रब्बी हंगामातील पिकांची पेरणी सुरु आहे. यामध्ये प्रामुख्याने हरभरा, गहु व ज्वारी पिके आहेत. रब्बी हंगामातील पिकांसाठी रासायनिक खते जिल्ह्यात उपलब्ध आहेत. पंरतू बऱ्याच शेतकऱ्यांचा कल डी.ए.पी.खताच्या वापराकडे दिसून येतो. त्यामुळे बाजारात डी.ए.पी. खताची मागणी वाढलेली दिसते. उपलब्ध संयुक्त खतामधून सुध्दा पिकाच्या शिफारशिप्रमाणे रासायनिक खताची मात्रा देता येवू शकते, त्यामुळे शेतकऱ्यांनी डी.ए.पी. खताचा आग्रह न धरता संयुक्त खतातून पिकाला योग्य मात्रात खत द्यावे. असे आवाहन परभणी जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी यांनी केले आहे. बाजारात 10.10.26, 15.15.15, 12.32.16, 20.20.0.13, 24.24.0 ही संयुक्त खते पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत तसेच सिंगल सुपर फॉस्फेट, म्युरेट ऑफ पोटॅश, 24.24.00 ही खते सुध्दा उपलब्ध आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी पेरणीकरीता संयुक्त खते वापरावी. हरभरा पिकासाठी एकरी 10 किलो नत्र 20 किला स्फुरद, 12 किलो पालाश देण्यासाठी 10.10.26 हे खत 75 किलो युरियामधून दिल्यास एकरी 1765 रुपये किंवा 15.15.15 हे खत 50 किलो अधिक सिंगल सुपर फॉस्फेट 50 किलो अधिक म्युरेट मुरेट ऑफ पोटॅश 40 किलो वापरल्यास 2492 रुपये किंवा डीएपी 75 किलो अधिक म्युरेट ऑफ पोटॅश 25 किलो वापरल्यास 2320 रुपये खर्च येतो. गहु (कोरडवाहू) पिकाला 40.2020 एकरी मात्रा देण्यासाठी 20.20.13 हे खत 100 किलो अधिक 50 किलो युरियामधून दिल्यास एकरी 2766 रुपये तसेच बागायती वेळेवर गहु पेरण्यासाठी 40.20.20 ही मात्रा देण्यासाठी 10.10.26 हे खत 80 किलो अधिक युरिया 43 किलो वापरल्यासि एकरी 4940 रुपये खर्च येतो. उशीरा पेरण्यात येणाऱ्या गव्हासाठी एकरी 32.16.16 नत्र स्फुरद व पालाश देण्यासाठी 15.15.15 हे खत 100 किलो अधिक युरिया 40 किलो दिल्यास 2813 रुपये किंवा डीएपी 35 किलो अधिक म्युरेट ऑफ पोटॅश 80 किलो अधिक 50 किलो युरियामधून दिल्यास एकरी 3850 रुपये खर्च येतो. यावरुन डी.ए.पी. खताऐवजी इतर संयुक्त खते वापरल्यास खर्चात बचत होते आणि शिफारशीप्रमाणे मात्रा सुध्दा देता येते. तरी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी रब्बी हंगामात पिकासाठी डीएपी ऐवजी संयुक्त व इतर खतांचा वापर करावा. असे आवाहनही कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. -*-*-*-*-