परभणी, दि.30 (जिमाका) :- जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत समिती व नगर पंचायत आणि ग्रामीण भागातील वस्त्यांची व रस्त्यांची नावे बदलून अशा जातीवाचक नावाऐवजी महापुरुषांची व लोकशाही मुल्यांशी निगडीत नावे देवून जिल्ह्यात सामाजिक सलोखा व सौहार्द निर्माण होवून राष्ट्रीय एकात्मता वृध्दींगत होणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने लोकप्रतिनिधी, सदस्य आणि पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेवून वस्त्यांची व रस्त्यांची जातीवाचक नावे बदलून महापुरुषांची व लोकशाही मुल्यांशी निगडीत नवीन नावे देण्याबाबतच्या राष्ट्रीय कामामध्ये सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केले आहे. महाराष्ट्रातील अनेक शहरातील व ग्रामीण भागातील अनेक गावांची, वस्त्यांची आणि रस्त्यांची नावे जातीवाचक असल्याची बाब महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला भुषणावह नाही. सामाजिक सलोखा व सौहार्द निर्माण होवून राष्ट्रीय एकात्मता वृध्दींगत होण्याच्या दृष्टीने अशा सर्व गावांची, वस्त्यांची व रस्त्यांची नावे बदलून अशा जातीवाचक नावाऐवजी महापुरुषांची व लोकशाही मुल्यांशी निगडीत नावे देण्याबाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दि.11 डिसेंबर 2020 रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे. असे परभणी समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त यांनी कळविले आहे. -*-*-*-*- Attachments area