
परभणी, दि.02 (जिमाका) :- जिल्ह्यात कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून योग्य त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोनाचा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून नागरिकांनी जबाबदारीने सामाजिक हिताच्यादृष्टीकोनातून लसीकरण करुन घेणे अत्यंत आवश्यक आहे. मागील काही दिवसांपासून कोरोनाचे टळलेले संकट पुन्हा ओमिक्रॉनच्या नव्या व्हेरियंटमध्ये पुन्हा येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी मास्क, सॅनिटायझरसह शारीरिक अंतर पाळुन कोविड-19 प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे तसेच लसीकरण करुन घ्यावे. असे आवाहन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केले आहे. कोरोनाची रुग्णसंख्या ही आवाक्यात येत असतांना तसेच जिल्ह्यात दररोज होणाऱ्या चाचण्यामध्ये कोरोनाचा रुग्ण सापडत नाही याकडे पाहुन सामान्य नागरिक कोरोना निघुन गेला आहे. असे समजत मास्क, सॅनिटायझर आणि शारीरिक अंतर न पाळत बेफिकीरीने फिरत असतांना दिसून येत आहे. कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट पेक्षा ओमिक्रॉन हा त्याच्या 50 पट घातक असल्याचे निष्कर्षातून सिध्द झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी वावरतांना कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे. वेळोवेळी साबणाने स्वच्छ हात धुवावेत, मास्कचा योग्य रितीने वापर करतच मुख्य म्हणजे शारीरिक अंतराचे पालन करणेही गरजेचे आहे. लोकांनी लसीकरणाला प्रतिसाद द्यावा याकरीता उपाययोजना करण्यात येत असून लसीकरण प्रमाणपत्र नसेल तर पेट्रोल-डिझेल पंपावर मिळणार नाही अशी ताकीद देवून वॉर्डावॉर्डात तसेच गर्दीच्या परिसरात लसीकरण कॅम्पचे आयोजन करण्यात येत आहे. नागरिकांनी व लोकप्रतिनिधींनी संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेवून सर्व सामान्य जनतेला कोरोनाचे नियमाचे पालन करण्यास व कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण पुर्ण करण्यास प्रोत्साहीत करण्यासाठी सामाजिक दायित्वातून भाग घ्यावा. जिल्हा प्रशासनाने दक्षिण आफ्रीकेतून व त्यामार्गे इतर देशातून येणाऱ्या नागरिकांना नोंदणी करण्याचेही आवाहन केले आहे की ज्यामुळे त्यांची आरटीपीसीआर चाचणी करुन जिल्ह्याला सुरक्षित कसे ठेवता येईल. तसेच जिल्ह्याच्या सिमांवर बंदी न घालता त्या ठिकाणी लसीकरण प्रमाणपत्र आणि आरटीपीआर तपासणीचे काम अहोरात्र सुरु आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेवून जिल्ह्यातील नागरिकांनी कोरोना विषयक जिल्हा प्रशासनाने दिलेले सर्व नियामांचे पालन करावे. तसेच ज्या नागरिकांनी अद्यापपर्यंत लसीकरण करुन घेतलेले नाही त्यांनी तात्काळ लसीकरण करुन घेत आपले आणि आपल्या कुटुंबाचे संरक्षण करावे. असही आवाहन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केले आहे. -*-*-*-*-