11 जानेवारी रोजी 11.11 मिनिटांना जिल्हाभर राष्ट्रगीताद्वारे स्वातंत्र्याला वंदन

 – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

 ⦁ स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शासनाच्या प्रत्येक विभागाकडून विविध उपक्रमांचे नियोजन  

रिव्हर्स ऑफ इंडिया या उपक्रमांतर्गत शुक्रवार 17 डिसेंबर पासून   

नांदेड (जिमाका) दि. 16 :- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शासनाने निर्देशीत केलेल्या पाच घटकांवर आधारीत जिल्हा प्रशासनाने विविध उपक्रमांचे नियोजन केले आहे. येत्या 11 जानेवारी रोजी सकाळी 11.11 मिनिटाला जिल्ह्यातील सर्व शाळांसह शासकीय, निमशासकीय सेवाभावी संस्था, कार्यालय या ठिकाणी राष्ट्रगीताद्वारे सामुहिकरित्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला अभिवादन केले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले. शिक्षण विभागातर्फे या उपक्रमाबाबत समन्वय साधला जात असून जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांचे यात अधिक योगदान असेल. ज्या ठिकाणी निवडणूक आचारसंहिता नाही अशा प्रत्येक गावात, वाडी-वस्तीवर शालेय शिक्षण समितीसह गावातील ज्येष्ठ नागरिकांनाही सन्मानाने निमंत्रीत करून यात त्यांचाही सहभाग घेण्यात यावा, असे निर्देशही डॉ. इटनकर यांनी दिले. 

जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त हाती घ्यावयाच्या विविध उपक्रमांबाबत डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे व्यापक बैठक नुकतीच झाली. या बैठकीस जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांची उपस्थिती होती. 

रिव्हर्स ऑफ इंडिया या उपक्रमांतर्गत शुक्रवार 17 डिसेंबर रोजी सकाळी 7 ते 11 या कालावधीत अधिकारी-कर्मचारी, अशासकीय संस्था व ग्रामस्थ यांच्या श्रमदानातून गोदावरी नदीच्या परिसराची स्वच्छता, सपाटीकरण व हेरीटेज वॉकसाठी रस्ता तयार करणे, रविवार 19 डिसेंबर रोजी त्रीकूट ते मुगट प्राथमिक आरोग्य केंद्र मॅराथॉन स्पर्धा, सोमवार 20 डिसेंबर रोजी चित्रकला स्पर्धा व देशभक्तीपर गीत, छायाचित्र स्पर्धा, मंगळवार 21 डिसेंबर रोजी एकात्मतेची शपथ व योगाशिबीर, वृक्षलागवड, पर्यावरण संवर्धन या विषयावर निबंध लेखन स्पर्धा, बुधवार 22 डिसेंबर रोजी शालेय विद्यार्थ्यांचे नृत्य, नाटक इत्यादी स्पर्धा व महिलांच्या सहभागाने नदीपात्रात दिवे लावून दिपोत्सव आदी विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षण विभाग, महसूल विभाग व संबंधित विभागामार्फत तयारी पूर्ण केली जात आहे. यात अधिकाधिक नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन उपजिल्हाधिकारी संतोषी देवकुळे यांनी केले आहे. 

जिल्ह्यातील बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यादृष्टिने रोजगार व कौशल्य विभाग, आयटीआय येथे रोजगार मेळावे आयोजित करण्यावर शासनाने भर दिला आहे. जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्राकडे लागणाऱ्या मनुष्यबळांची माहिती घेऊन त्या-त्या ठिकाणी अनुभवी कुशल बेरोजगारांसह प्रशिक्षणार्थ्यांनाही संधी दिली जावी यावर संबंधित विभागाने भर द्यावा, असे त्यांनी निर्देश दिले. 

क्रीडा विभागातर्फे नवीन वर्षाच्या स्वागत दिनी म्हणजेच 1 जानेवारी 2022 रोजी सकाळी सायकल मॅरॉथान व सगरोळी येथील सैनिक विद्यालयात सुर्यनमस्कार महोत्सव हाती घेण्यात आला आहे. तर कृषि विभागातर्फे “विकेल ते पिकेल” अंतर्गत जिल्ह्यातील 75 शेतकऱ्यांचा सन्मान, फळबाग लागवड योजना व इतर योजनेच्या माध्यमातून 75 हजार झाडांपैक्षा अधिक लागवड, धान्य महोत्सव आदी उपक्रम घेतले जात आहेत. महिला व बालविकास विभागांतर्गत जिल्ह्यातील 100 अंगणवाड्याचे रुपांतर स्मार्ट अंगणवाडीमध्ये केले जाणार आहे.‍

शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना अत्यावश्यक असणाऱ्या विविध प्रमाणपत्रांसाठी स्वतंत्र कॅम्प घेऊन दहावी, अकरावी, बारावी विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रांचे वाटप 26 जानेवारी पर्यंत पूर्ण करण्याबाबतही त्यांनी शिक्षण विभागाला सांगितले. याचबरोबर आठवड्यातील ठरावीक दिवस निश्चित करून गावातील समस्या व प्रशासकीय गरजा गावपातळीवरच सुटण्यासाठी प्रशासन आपल्या गावी ही मोहिम प्रभावीपणे राबविण्याबाबत त्यांनी निर्देश दिले.  सर्व संबंधित विभागाद्वारे याबाबत समन्वयाने नियोजन करण्यावर भर द्यावा, असेही आवाहन त्यांनी केले.

000000