परभणी, दि.16 (जिमाका) :- परभणी जिल्ह्याची गौरवशाली परंपरा लक्षात घेवून आपल्या जिल्ह्याचे एक गौरवगीत तयार करण्याचा जिल्हा प्रशासनाचा मनोदय असून त्याकरीता साहित्यक्षेत्रातील सर्व मान्यवरांनी गुरुवार दि. ३० डिसेंबर २०२१ पूर्वी त्यांनी आपले काव्य जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी यांच्याकडे दाखल करावे. आपले काव्य dio-pbn@nic.in या ई-मेलवरही मुदतीत दाखल करू शकतात. तरी जिल्हा प्रशासनाच्या या नाविण्यपूर्ण उपक्रमास सहकार्य करून जिल्ह्यातील साहित्यिक, कवी प्रतिभा असणाऱ्या नागरिकांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदवावा. असे आवाहन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केले आहे. परभणी जिल्ह्यात चालुक्यकालीन शिल्प, प्राचीन मंदीरे, नानाविध शिल्पकलाकृती, मनमोहक पुष्करणी, शिलालेख विपुलतेने उपलब्ध आहेत. परभणी जिल्ह्यास साहित्य कला क्षेत्रात गौरवशाली परंपरा लाभलेली आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात परभणी जिल्ह्यातील अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी सहभाग नोंदविलेला आहे. दक्षिण गंगा गोदावरीच्या प्रवाहाने जिल्ह्यातील परिसर पावन झाला आहे. थोर संत जनाबाई, संत श्रेष्ठ श्री. पाचलेगावकर महाराज, परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती – टेंबे स्वामी, श्री. योगानद महाराज आणि श्री. चिंतामणी महाराज या थोर संत महात्म्यांच्या अधिवासाने ही भुमी पुलकीत झालेली आहे. भारताच्या सार्वभौमिकतेचे प्रतिन म्हणुन १०८ वर्षांचा इतिहासाचा साक्षीदार हजरत तुरा बुल हक दर्गा परभणी जिल्ह्यात आहे. प्राचीन शिल्पाकृती असलेले जैनधर्मियांचे तीर्थक्षेत्र नेमगिरी तसेच श्री. साई बाबांचे जन्मस्थळ म्हणुन या जिल्ह्याचा नावलौकीक सर्वदूर पसरलेला आहे. संगीत क्षेत्रातील मान्यवर या जिल्ह्याला लाभलेले असून स्वातंत्रपूर्व काळापासून येथील सांस्कृतिक चळवळीतून अनेक कलावंतांनी राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय पातळीवर जिल्ह्याचे नाव झळकवले आहे. गुरुवार दि. ३० डिसेंबर २०२१ पर्यंत प्राप्त लेखनाचे संकलन करून जिल्हाधिकारी परभणी यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीद्वारे त्यातील एक समर्पक गीत परभणी जिल्हा गौरवगीत म्हणुन निवडण्यात येईल. निवड झालेल्या गीतकारास जिल्हाधिकारी परभणी यांचे हस्ते सन्मानपत्र देण्यात येणार आहे. लिखाण दाखल करण्याविषयी अटी आणि शर्ती पुढीलप्रमाणेआहेत. यामध्ये १. लिखाण कागदाच्या एका बाजुला सुवाच्य हस्ताक्षरात किंवा टंकलीखित असावे. २. गीतकाराचे नाव, संपूर्ण पत्ता, संपर्क क्रमांक, पासपोर्ट आकाराचा फोटो सोबत जोडणे आवश्यक आहे. ३. सादर केलेल्या गीताचा अन्य कोणत्याही स्पर्धा कींवा ईतर प्रसिद्धीसाठी वापर करता येणार नाही. ४. गीतकाराचे नाव कायम ठेवून जिल्हा प्रशासनास निवड केलेल्या गौरव गीताला संगातबद्ध करणे, गायकांकडून गावून घेणे तसेच विविध स्तरावर ह्या गौरव गीताची प्रसिद्धी करण्याचे अधिकार असतील. ५. जिल्हा प्रशासनाने संगीतबद्ध केलेल्या चाली व्यतिरीक्त अन्य कोणतीही चाल देण्याची परवानगी देण्यात येणार नाही. असेही कळविण्यात आले आहे. -*-*-*-*-