परभणी, दि.28 (जिमाका) :- मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग आणि इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत देण्यात येणाऱ्या भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क, राजर्षी शाहु महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती व व्यावसायिक पाठ्यक्रमात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता योजनेचे सन 2021-22 या शैक्षणिक वर्षातील अर्ज भरण्यासाठी https://mahadbtmahait.gov.in हे संकेतस्थळ सुरु झाले आहे. तरी जिल्ह्यातील अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी दि.31 मार्च 2022 पर्यंत ऑनलाईन अर्ज भरुन त्याची एक प्रत संबंधित महाविद्यालयात सादर करावी. असे आवाहन समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त गीता गुठ्ठे यांनी केले आहे. महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेले अर्ज समाज कल्याण कार्यालयाकडे सादर करण्यापुर्वी अर्जाची छाननी करुन शिष्यवृत्तीस पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज मंजूरीसाठी सादर करावेत. तसेच अर्जात काही त्रुटी असल्यास संबंधित विद्यार्थ्यांकडून त्रुटींची पुर्तता करुन घ्यावी. शिष्यवृत्तीस पात्र विद्यार्थी लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता महाविद्यालयाने घ्यावी. विहीत मुदतीत अर्ज सादर न केल्यास एखादा मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास त्यास सामाजिक न्याय व इतर मागास बहुजन कल्याण विभाग जबाबदार राहणार नाही. ज्या विद्यार्थ्यांचे आधारकार्ड मॅपरद्वारे बँकेशी लिंक झालेले नाही अशा विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची रक्कम बँक खात्यामध्ये जमा झाली नाही त्यांनी तात्काळ आधार मॅपरद्वारे बँकेशी लिंक करुन घ्यावे व महाडीबीटीची प्रोफाईल अद्यावत करुन घ्यावी. असेही समाज कल्याण विभागाकडून कळविण्यात आले आहे. -*-*-*-*-