परभणी, दि. 3 (जिमाका) :- जानेवारीपासून महाराष्ट्र ग्रामीण बँकेमार्फत शेतकरी व थकीत कर्ज परतफेड करण्यासाठी आकर्षक व्याज सवलत योजना “ महाग्रामीण बळीराजा तारणहार योजना” जाहीर केली आहे. यात थकीत कर्जावर भरीव सूट देण्याची योजना बँकेने केली आहे. ही योजना मर्यादित कालावधीसाठी असून 1 जानेवारी 2022 ते 31 मार्च 2022 पर्यतच ही योजना लागू राहणार आहे. या योजनेमुळे शेतकरी थकबाकी मुक्त होवून नवीन कर्ज मिळेल व त्यासोबतच त्यांचे सिबिल रेकॉर्ड चांगले होण्यास मदत होईल. तरी या योजनेचा लाभ जास्तीत जास्त खातेदारांनी घ्यावा. असे आवाहन बँकेचे परभणी विभागाचे क्षेत्रीय व्यवस्थापक गिरीश बेंद्रे यांनी केले आहे. मागील काही वर्षांपासून परभणी जिल्ह्यात कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी, कोव्हीड -१९ च्या विविध लाटांमुळे अडचणीत आलेल्या बँकेच्या थकीत कर्जदाराला खाजगी सावकाराकडे जाण्याची वेळ येत आहे. अशा कठीण प्रसंगात बँक अशा खातेदारासोबत उभी असून त्यांच्याकडील थकीत कर्जावर भरीव सूट देण्याची योजना बँकेने जाहीर केली आहे. योजनेचे वैशिष्ट म्हणजे थकीत कर्ज व्याजात ६० ते ७५ टक्के अशी घसघसीत सूट देण्यात येणार आहे तसेच त्याचे थकीत कर्ज परतफेड केल्यावर त्यांना लगेच बँकेच्या नियमानुसार नवीन कर्ज दिले जाणार आहे. या योजनेच्या नावानुसारच शेतकरी बांधवासाठी ही योजना खऱ्या अर्थाने तारणहार होणार आहे. शेतकरी व थकबाकीदारांपर्यत ही योजना पोहचावी यासाठी सुटसुटीत व सोपी तसेच पारदर्शक कार्यपद्धती राबविण्यात येणार असून त्वरित बँकेच्या जवळच्या शाखेस संपर्क करणे गरजेचे आहे. असेही कळविण्यात आले आहे. -*-*-*-*-