दाभड बावरीनगर येथील धम्म परिषदेचे ऑनलाईन आयोजन 

·         कोरोना स्थितीमुळे परिसरात दुकाने / स्टॉल लावण्यास मनाई   

नांदेड (जिमाका) दि. 16 :- पस्तीसाव्या आखील भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन 17 व 18 जानेवारी रोजी अर्धापूर तालुक्यातील दाभड बावरीनगर येथे करण्यात आले आहे. परंतु देशासह राज्यात कोरोना व ओमिक्रॉम विषाणुचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता या धम्म परिषदेचे ऑनलाईन प्रसारण करण्यात येणार आहे. भाविकांनी दाभड बावरीनगर येथे न येता ऑनलाईन दर्शनाचा लाभ घ्यावा. या परिसरात दुकाने व स्टॉल लावण्यास मनाई करण्यात आली आहे. 

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या आदेशान्वये समुहाला बाहेर पडणे व फिरण्यासाठी सकाळी 5 ते 23 व रात्री 23 ते 5 यावेळेत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. धार्मिक कार्यक्रमासाठी कमाल मर्यादा 50 व्यक्तींची ठेवण्यात आली आहे. ही धम्म परिषद ऑनलाईन प्रसारीत होणार असून या परिसरात दुकाने व स्टॉल लावण्यास मनाई केल्याची माहिती धम्म परिषदेचे आयोजक डॉ. सी. पी. गायकवाड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.  

बावरीनगर दाभड येथील आयोजित ही धम्म परिषद राज्य शासनाने दिलेल्या अटी व शर्तीचे पालन करुन होणार आहे. ही धम्म परिषद ऑनलाईन प्रसारीत केली जाणार आहे. भाविकांनी दाभड बावरीनगर येथे न येता ऑनलाईन दर्शन घ्यावे. या परिसरात कोणीही दुकाने व स्टॉल लावू नयेत. नांदेड पोलीसदल, बावरीनगर दाभड कमिटी व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन अर्धापूर तहसिलदार उज्ज्वला पांगरकर व पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांनी संयुक्तपणे केले आहे.   

000000