*लसीकरणाची मोहीम जेव्हा नोकरीचा भाग न राहता उत्तरदायीत्वाची जागा घेते*

▪️भाजी विक्रेत्यांच्या लसीकरण मोहिमेत 1 हजार 800 विक्रेते लसवंत
नांदेड (जिमाका) दि. 19 :- त्यांचा दिवस सकाळी 9 वाजता बरोबर सुरू होतो. आवश्यक असलेले लसीकरणाचे सर्व किट, शीतपेटी, इंजेक्शन, व्हिटॅमीन डी सह पॅरासीटेमॉलच्या टॅबलेट व इतर आवश्यक साहित्य घेण्याबाबतच्या सूचना त्यांना डॉक्टर्स देतात. पाच-पाच जणांचे हे पथक वैद्यकीय अधिकाऱ्यासह तयार होते. लसीकरण केवळ शासकीय ड्युटीचा भाग नाही तर यासाठी लोकांना साक्षर करून, त्यांच्या मनातली भिती दूर करून, त्यांच्यात मिसळून लसीकरणाला गती देण्याच्या जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर आणि मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांच्या सूचना घेऊन हे पथक कर्तव्याला निघते. आज यांच्या वाट्याला नांदेड येथील शेतकरी चौक ते छत्रपती चौक या रस्त्याच्या दुतर्फा बसलेले भाजीवाले, गाडीवाले यांची तपासणी करुन त्यांना लसीकरण करण्याची जबाबदारी आहे.
“दादा लस घेतली का ? तुमचे प्रमाणपत्र दाखवा, नाही घेतली तर खरे सांगा, याचा त्रास अजिबात होत नाही” असा विनवणीचा सूर लावत पथकातील नेमलेल्या अधिसेविका मोहिमेची सुरूवात करतात. सोबत डॉक्टर आवश्यक त्या ठिकाणी भाजीपाला विक्रेते मोबाईल मधील प्रमाणपत्र दाखवतात. ज्यांनी लस घेतली नाही ते प्रमाणिकपणे लस घेतली नसल्याचे सांगून तयारी दर्शवतात. पथकातील एक अधिसेविका शीतपेटीतून लसीची मात्रा नव्या इंजेक्शन मध्ये भरते. “दादा हात पुढे करा, काही त्रास होत नाही” असे सांगून त्या विक्रेत्याला लसवंत करते.
लसीकरणाचे हे काम कर्तव्याचा जरी भाग असला तरी मनालाही खूप सारा आनंद देणारा आहे. काही प्रसंगी लोक हुज्जत घालतात. तर अधिकांश लोक हे लसीकरण झाले नसेल याची कबुली देऊन पुढे सरसावतात. विशेष म्हणजे आहे फळ भाजीपाला विक्रेत्यांकडे मोबाईल असून त्यात त्यांनी प्रमाणपत्र सेव्ह करून ठेवले आहे, ते प्रमाणिकपणे दाखवून सहकार्य करतात, अशी प्रतिक्रिया या लसीकरणाच्या पथकाचे नेतृत्व करणारे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेशसिंग बिसेन यांनी दिली. जिल्हा प्रशासनातर्फे रस्त्यावरील विक्रेत्यांसाठी या 2 दिवसात विशेष मोहिम घेतली असून आज सकाळ पर्यंत 1 हजार 800 भाजीपाला व इतर विक्रेत्यांचे लसीकरण केल्याची माहिती त्यांनी दिली. जनतेनेही आपल्या राष्ट्रीय कर्तव्याचा व राष्ट्रसेवेचा हा एक भाग समजून लसीकरणासाठी पुढे येण्याचे आवाहन त्यांनी केले.
000000