सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, कॅन्सर हॉस्पिटल,
दत्त चिकित्सा महाविद्यालयाची उपलब्धता करून देऊ
– पालकमंत्री अशोक चव्हाण
नांदेड (जिमाका) दि. 23 :– नांदेड जिल्ह्याचा विस्तार इतर जिल्ह्याच्या तुलनेत मोठा आहे. येथील प्रत्येक तालुक्याच्या नागरिकांना आरोग्याच्या चांगल्या सेवा-सुविधा नांदेड येथील आपल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात उपलब्ध करुन देण्यासाठी मी कटिबद्ध आहे. सर्वसामान्य नागरिकांना काही गंभीर आजार झाले तर त्यांना त्यावर उपचार घेणेही परवडत नाही, हे लक्षात घेऊन वैद्यकीय महाविद्यालयातील सेवा-सुविधा अधिक भक्कम करू, असे नि:संदिग्ध प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.
डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 200 विद्यार्थी क्षमतेचे वसतीगृहाचे भूमीपूजन पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते आज करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास आमदार अमर राजूरकर, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाच्या अभ्यागत मंडळाचे अध्यक्ष आमदार मोहनअण्णा हंबर्डे, सदस्य आमदार बालाजी कल्याणकर, महापौर सौ. जयश्री पावडे, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. उद्धवराव भोसले, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. पी. टी. जमदाडे, अभ्यागत मंडळाचे सदस्य संतोष पांडागळे, डॉ. करुणा जमदाडे, डॉ. दि. बा. जोशी, आशाताई शिंदे आदींची उपस्थिती होती.
वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगले शैक्षणिक वातावरण असले पाहिजे. याचबरोबर इतरांच्या आरोग्याची काळजी घेतांना त्यांचेही आरोग्य सदृढ राहिले पाहिजे, हे लक्षात घेऊन शेजारीच असलेल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ व वैद्यकीय महाविद्यालयाच्या मध्यभागी क्रीडा संकुल विकसीत करता येईल का याबाबत आम्ही प्रयत्न करू. आपल्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या ज्या उपलब्ध सुविधा आहेत त्या प्रामुख्याने कोविड-19 साठी आपण नव्यानेच उभारल्या. यात कोविड वार्ड, लहान मुलांचा वार्ड, दवाखाण्यातील वापरलेले पाण्यावर प्रक्रिया करुन त्याला निसर्गपूरक करण्यासाठी उभारण्यात आलेला मलनिस्सारण प्रकल्प, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर या सुविधांनी सर्वांचे लक्ष वेधले आहे. जे करू ते चांगलेच करू, यात तडजोड नाही असे स्पष्ट करून या सुविधा पुरेशा नाहीत याची आम्हाला कल्पना आहे. येत्या काही दिवसात याठिकाणी चागल्या दर्जाचे कॅन्सर उपचार केंद्र व्हावे, सुपरस्पेशलटी हॉस्पिटल व्हावे, दत्तचिकित्सा महाविद्यालयाच्या इतर सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी शासन स्तरावर योग्य ती पावले उचलू असे सूचक विधानही त्यांनी केले.
याठिकाणी उभारण्या येणाऱ्या वसतीगृहाला भरघोस 19 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. येथील नवीन प्रशासकीय इमारतीला चांगल्या सुविधाजनक कार्यपद्धती डोळ्यापुढे ठेवून फर्नीचरही देण्यात आले आहे. आपल्या नांदेड येथे साकारलेले वैद्यकीय हब लक्षात घेता चांगल्या नर्से ही उपलब्ध व्हाव्यात यासाठी नर्सींग कॉलेजही आपण येत्या शैक्षणीक वर्षापासून सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी उपस्थित आमदारांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मुकुंद कुलकर्णी यांनी केले तर आभार बोडके यांनी मानले.
00000