प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण उत्साहात संपन्न लसीकरण कार्यक्रमाला प्रतिसाद देवून कोविडवर मात करुया – पालकमंत्री नवाब मलिक परभणी, दि.26 (जिमाका) :- लोकशाही प्रणालीचा दीपस्तंभ ठरलेली भारतीय राज्यघटना राष्ट्राला अर्पण 26 जानेवारी 1950 रोजी अर्पण करण्यात आली आणि जगामध्ये भारत देश एक प्रजासत्ताक गणराज्य म्हणून उदयास आला. लोकशाही तंत्राने घटनेनूसार देशाचा कारभार सुरु झाला. लोकशाही बळकट करण्यासाठी मतदारांनी मतदार यादीत नाव नोंदणी करत मतदारांमध्ये जागृती होणे गरजेचे आहे. जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या लसीकरण कार्यक्रमाला प्रतिसाद देवून कोविडवर मात करुया. प्रतिपादन राज्याचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे मंत्री तथा परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी केले. प्रजासत्ताक दिनाचे मुख्य शासकीय ध्वजारोहण परभणी येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मलाताई विटेकर, खासदार श्रीमती फौजिया खान, आमदार डॉ.राहुल पाटील, आमदार बाबाजानी दुर्राणी, , जिल्हाधिकारी आंचल गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, पोलिस अधिक्षक जयंत मीना आदिंची उपस्थिती होती. पालकमंत्री मलिक म्हणाले की, नागरिकांनी मतदार यादीत आपले नाव आहे की नाही याची खात्री करणे तसेच मतदार यादीत नाव नोंदविणे आवश्यक आहे. कोरोना सारख्या संसर्गजन्य महामारीची लाट संपुर्ण जगात आली सुरुवातीला कोव्हिडमुक्त परभणी जिल्हा होता परंतू कालांतराने जिल्ह्यातही रुग्ण दिसून आले. जिल्हा प्रशासनाने पहिल्या लाटेत व्यवस्थित काम केले तसेच करत आहे. आजच्या घडीला तिसरी लाट सुरु झाली असून लसीकरणामुळे कोविडमुक्त होण्याची संख्या वाढत आहे ते लसीकरणामुळेच शक्य झाले आहे. तरुणांसाठी लसीकरणाचा कार्यक्रम सुरु झाला असून तरुणांनी लसीकरण करुन घ्यावे. ज्यांनी लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्या आहेत त्या कोविडच्या रुग्णांना जास्तीचा त्रास होत नसल्याचे दिसून येत आहे. शासकीय वैद्यकिय महाविद्यालय शासकीय यंत्रणेकडून चालविण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येत असून लवकरच निर्णय होईल. शेतीवर आधारित उद्योग चालू असतांना सेलू येथील 250 हेक्टर एमआयडीसीचा आराखडा लवकरच पुर्णत्वास नेला जाईल. आपले राज्य विकासाच्या दृष्टीने जाण्यासाठी राज्य शासनाकडून विविध लोकोपयोगी निर्णय घेतले जात आहेत. परदेशातील कंपन्यांना गुंतवणूकीबाबत धोरण निर्माण करुन त्या माध्यमातून बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करुन दिला जात आहे. कौशल्य विकासच्या माध्यमातूनही कोव्हिडजन्य परिस्थितीत बेरोजगारांना रोजगार दिला गेला. शासनाने कोविड परिस्थतीत घालून दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करावे. मागील आठवड्यात सर्व शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला असून लवकरच सर्व परिस्थिती पुर्व पदावर येईल. राज्य शासनाकडून जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ देण्यात आलेला आहे. असेही त्यांनी सांगितले. यावेळी कोविडजन्य परिस्थितीत दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना 5 लक्ष रुपये मुदतठेव धनादेश परभणी येथील जगनाथ नागोराव गाडे व जिंतूर येथील पंढरीनाथ महादू कांदे यांना देण्यात आला. तर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांना सत्कार करण्यात आला. तसेच उत्कृष्ट कामगिरी पार पाडलेल्या पोलिस अंमलदारांना पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी पालकमंत्री श्री.मलिक यांनी उपस्थित स्वातंत्र्यसैनिक व मान्यवरांची भेट घेवून शुभेच्छा दिल्या. या ध्वजारोहण समारंभास निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, पदाधिकारी, अधिकारी-कर्मचारी, नागरिक, विद्यार्थी आदि उपस्थित होते. प्रशासकीय इमारतीत ध्वजारोहन परभणी येथील प्रशासकीय इमारतीत निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांच्या हस्ते ध्वजारोहन संपन्न झाले. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अश्विनी स्वामी, यांच्यासह इमारत परिसर कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. -*-*-*-*-