परभणी, दि.27 (जिमाका) :- इंटरनेट व इतर माध्यमावर भरपूर माहिती उपलब्ध असून त्या माहितीची विश्वसनीयता कमी प्रमाणात आहे. मराठी भाषेमध्ये अगदी संतवाडमयापासून ते आजपर्यंत विपुल अशी ग्रंथसंपदा उपलब्ध असून त्या ग्रंथाचे प्रत्येकाने वाचन आणि मनन केले पाहिजे. आज दैनंदिन जीवनामध्ये विविध भाषांच्या वापर वाढला असून इतर भाषाचा अनादर न करता आपली मातृभाषा मराठीचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. मराठी भाषा ही प्रत्येकाच्या जगण्याचा श्वास बनली पाहीजे. असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजूषा कापसे यांनी केले. मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा निमित्त दि.27 जानेवारी 2022 रोजी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयामध्ये कोरोनाचे नियम पाळून ग्रंथ प्रदशर्नाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा ग्रंथालय अधिकारी बालाजी संभाजी कातकडे हे हेाते तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामीण कथाकार राजेंद्र गहाळ, केंद्रीय विदयालयाचे प्राचार्य एच.चौधरी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते वि.वा.शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर उपकार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे यांच्या हस्ते ग्रंथ प्रदशर्नाचे उदघाटन संपन्न झाले. हे प्रदर्शन जिल्ह्यातील वाचकांसाठी आठवडाभर सुरु राहणार असून यातून विद्यार्थ्यांना वाचा, वेचा अथवा साठवा असा मोलाचा संदेश दिला जाणार आहे. कार्यक्रमास अजय वटटमवार, शंभोनाथ दुभळकर यांच्यासह विद्यार्थी वर्ग उपस्थित होता. -*-*-*-*-