परभणी, दि. 8 (जिमाका) :- सन 2021-22 या आर्थिक वर्षासाठी धनगर समाजातील जे विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळविण्यासाठी पात्र असूनही ज्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेला नाही. अशा बारावीनंतरच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेशित धनगर समाजातील विद्यार्थ्यांना पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना सुरु करण्यात आली आहे. यामध्ये भोजन, निवास व इतर शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट रक्कम वितर करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. तरी जिल्ह्यातील धनगर समाजातील पात्र विद्यार्थ्यांनी आपले अर्ज दि.28 फेब्रुवारी 2022 पर्यंत परभणी येथील समाज कल्याण कार्यालयात सादर करावेत. असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त यांनी केले आहे. योजनेच्या लाभासाठी विद्यार्थी धनगर समाजाचा असावा, अर्जासोबत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. पालकाचे उत्पन्न 2 लाख 50 हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे. विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ही महानगर पालिकेच्या हद्दीतील असावी. विद्यार्थी इयत्ता बारावीनंतरचे उच्च शिक्षण घेत असावा. इयत्ता बारावीमध्ये किमान 60 टक्के गुण प्राप्तच विद्यार्थी पात्र राहतील. प्रवेश घेतलेल्या अभ्यासक्रमाचा कालावधी 2 वर्षापेक्षा कमी नसावा. योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांने इयत्ता बारावीनंतरच्या मान्यताप्राप्त तंत्रशिक्षण तसेच व्यावसायिक शिक्षण अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयामध्ये केंद्रीभूत प्रवेश प्रक्रीयेद्वारे प्रवेश घेतलेला असावा. विद्यार्थ्यांची महाविद्यालयातील उपस्थिती किमान 60 टक्के असणे आवश्यक आहे. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याचे कमाल वय 28 वर्षापेक्षा जास्त नसावे. धनगर समाजातील अपंग विद्यार्थ्यांना सदर योजनेचा लाभ प्राथम्याने देय राहील. विद्यार्थी कोणत्याही प्रकारची नोकरी अथवा व्यवसाय करत नसावा. विद्यार्थी व शैक्षणिक संस्थानी सदर योजनेचा लाभ घेताना शासनाची फसवणूक केल्याचे आढळल्यास विद्यार्थी व शैक्षणिक संस्था कायदेशीर कार्यवाहीस पात्र राहील. तसेच लाभाच्या रक्कम 18 टक्के दंडनीय व्याजासह वसूल करण्यात येईल. असेही समाज कल्याण सहाय्यक आयुक्त यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे. -*-*-*-*-