परभणी, दि.११(जिमाका) : जिल्ह्यातील दिव्यांग आणि मतिमंद व्यक्तीच्या सशक्तीकरण आणि साह्यतेसाठी सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय भारत सरकार यांच्या नॅशनल ट्रस्ट 1999 अंतर्गत जिल्हास्तरावरील स्थानिक पातळीवरील समितीची बैठक आज जिल्हाधिकारी तथा समिती अध्यक्ष आंचल गोयल यांच्या अध्यक्षेत संपन्न झाली. जिल्हाधिकारी यांच्या सभागृहात आयोजित बैठकीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे, वैद्यकीय अधिक्षक अस्थिव्यंग डॉ. बी. टी. धुतमल, जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजेंद्र तुबाकले, समिती सदस्य, विजय कान्हेकर यांची उपस्थिती होती. यावेळी बैठकीत मानसिक विकलंगता, मेंदूचा पक्षघात, स्वमग्न आणि बहू विकंलगता या चार प्रवर्गातील दिव्यांग लाभार्थ्यांना पालकत्व बहाल करण्यासाठी नोंदणीकृत संस्थेचे प्रतिनिधी विजय कान्हेकर यांनी एकुण १७ अर्ज प्राप्त झाल्याची माहिती बैठकीत सादर केली. त्यावेळी समिती सदस्यांनी केलेल्या चर्चेनुसार आई-वडिल पालक असलेले ५ जणांचे पालकत्व निश्चित करण्यात आले. तसेच ज्यांचे इतर नातेवाईकांकडे पालकत्व द्यावयाचे आहे अशा प्रक्रियेत संबंधिताची गृह चौकशी करण्याचे निश्चित करुन १५ दिवसांनी अहवाल सादर करण्याचे जिल्हाधिकारी श्रीमती गोयल यांनी यावेळी निर्देश दिले. तसेच सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय भारत सरकार अंतर्गत जिल्हा व्यवस्थापन मंडळाची स्थापना करुन जिल्हा दिव्यांग पूर्नवसन केंद्र कार्यान्वित करण्यासाठी अपेक्षित प्रस्ताव मंजूरीसाठी केंद्राकडे सादर करण्यात अले आहे. यावेळी आकोला जिल्ह्याच्या धर्तीवर परभणी जिल्ह्यातील दिव्यांगाचे सर्व्हेक्षण करुन दिव्यांग लाभार्थ्यांना UDID कार्ड वितरणचा उपक्रम तालूकानिहाय राबविण्यात यावा अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी संबंधीतांना दिल्या. परभणी जिल्ह्यातील दिव्यांगाची लोकसंख्या अंदाजे ६० हजार असून त्यापैकी १४ हजार लोकांना UDID कार्ड उपलब्ध झाले आहेत. तसेच आकोला जिल्ह्याच्या धर्तीवर परभणी जिल्ह्यात सर्व्हेक्षण केल्यास दिव्यांग व्यक्तींची वय, लिंग, शिक्षण, प्रशिक्षण, रोजगार-स्वंयरोजगार आरोग्य विषयक सुविधा, कृत्रिम अवयव व साधनांची उपलब्धता संजय गांधी घरकुल योजना, रेशन कार्ड, केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनेचा लाभ इत्यादी दिव्यांगाच्या सर्वांगिण पुर्नवसनाचा कृती आराखडा तयार करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील दिव्यांगासाठी स्वरुप चॅरिटेबल फाऊंडेशन व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई यांच्या सहकार्याने जिल्हास्तरावर कर्णबधीर व ज्येष्ठ नागरिकांना श्रवण यंत्र उपलब्ध करुन देण्याचा कार्यक्रम लवकरच आयोजित करण्यात येणार आहे. तसेच जिल्हा रुग्णालय व जिल्हा दिव्यांग पुर्नवसन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांगासाठी कृत्रिम अवयव वितरण व साह्यता करणेबाबतचा कार्यक्रम आयोजित करण्याचे नियोजन करण्यात येणार असून याकरिता संबंधित विभागाने योग्य पूर्व नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्रीमती गोयल यांनी यावेळी दिले. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ५ टक्के निधीमधुन नॅशनल ट्रस्ट अंतर्गत समाविष्ट होणाऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांना निरामय योजने अंतर्गत लाभ देण्याचे देखील यावेळी बैठकीत निश्चित करण्यात आले. यावेळी एच. ए. सय्यद, अमेय अग्रवाल, एस. बी. वैद्य, दिव्यांग प्रतिनिधी रामराज कागणे आदींची उपस्थिती होती. -*-*-*-*-