परभणी, दि. 10 (जिमाका) :- महाराष्ट्र ग्रामीण बँकेने १ जानेवारी २०२२ पासून महाग्रामीण बळीराजा तारणहार योजना (एमबीटीवाय) लागू केली आहे. थकीत शेतकरी कर्जदारांना सुलभ व व्याजात सवलत देऊन कर्ज परतफेड करून पुन्हा कर्ज देणारी योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा परांडामार्फत लक्ष्मण गुंडीबा कदम रा. शिराळा ता. परांडा जि उस्मानाबाद यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडे शेत जमिन तारण ठेऊन द्राक्ष व डाळींब या पिकांसाठी रु ७ लाख ५० हजार कर्ज घेतले होते. सदरील कर्जाची व्याजासह थकबाकी रु १६ लाख 11 हजार 501 इतकी झाली असून वसुलीसाठी कायदेशीर कार्यवाही करण्यासाठी बँकेने तारण जमिनीचा शोध घेतला. तेंव्हा लक्ष्मण गुंडीबा कदम यांनी दि. १६/०३/२०१७ मौजे शिराळा येथील गट क्रमांक ७४ मधील तारण शेत जमीन महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे कर्ज तसेच थकीत ठेवून आपले वारस अमोल लक्ष्मण, राहुल लक्ष्मण , सुनील लक्ष्मण , अजित लक्ष्मण ,विजया लक्ष्मण कदम सर्व राहणार शिराळा यांचे नांवे केली आहे तसेच याच गटावर एचडीएफसी बँक शाखा बार्शीकडून पुन्हा कर्ज घेवून बँकेची फसवणूक केली आहे. त्यामुळे बँकेचे शाखा व्यवस्थापक यांनी दिनांक ५ फेब्रुवारी २०२२ रोजी परांडा पोलीस स्टेशन येथे लक्ष्मण गुंडीबा कदम यांचे विरूध्द भा.दं सं ४२० अन्वये फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. कोणत्याही शेत जमिनीवर कर्ज घेतल्या नंतर कर्ज परतफेड होईपर्यंत जमिनीचा फेरफार करता येत नाही तसेच तारण जमीन विकता येत नाही परंतु समाजातील काही अपप्रवृतीचे लोक सर्रास अशा बाबीचा दुरुपयोग करीत असल्याचे बँकेच्या निदर्शनास आले असून अशा अपप्रवृतीच्या लोकांविरुद्ध बँक फौजदारी खटले दाखल करणार आहे. अशा अप्रिय घटना टाळण्यासाठी महाग्रामीण बळीराजा तारणहार योजनेचा फायदा घेत शेतकरी बांधवांनी कर्जमुक्त होऊन पुन्हा कर्ज घेऊन आर्थिक मुख्य प्रवाहात सामील व्हावे. असे गिरीश बेंद्रे क्षेत्रीय व्यवस्थापक परभणी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे. -*-*-*-*-