परभणी, दि.16 (जिमाका) :- राज्य शासनाच्या उद्योग संचालनालयाच्यावतीने दरवर्षी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या लघु उद्योग घटकांना प्रथम व द्वितीय पारितोषिक देवून गौरविण्यात येते. सन 2019-2020 करीता जिल्ह्यातील पात्र लघु उद्योग घटकांनी जिल्हा उद्योग केंद्राच्यावतीने देण्यात येणाऱ्या जिल्हा पुरस्कारासाठी दि.22 फेब्रुवारी 2022 पर्यंत अर्ज सादर करावेत. असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक पी.डी.हणबर यांनी केले आहे. जिल्हा उद्योग केंद्रामार्फत देण्यात येणाऱ्या प्रथम पुरस्कारासाठी 15 हजार रुपये रोख व गौरवचिन्ह तसेच द्वितीय पुरस्कारासाठी 10 हजार रुपये रोख आणि गौरवचिन्ह देवून सन्मानित करण्यात येणार आहे. यासाठी उद्योग घटकाची जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयाकडे स्थायी लघु उद्योग म्हणून मागील तीन वर्षापुर्वी नोंदणी झालेली असावी तसेच उद्योग घटक मागील दोन वर्षापासून सतत उत्पादनात असणे आवश्यक आहे. उद्योग घटक कोणत्याही वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा. यापुर्वी ज्या उद्योग घटकांनी राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळालेले नाहीत असेच उद्योग घटक जिल्हा पुरस्कारासाठी पात्र ठरतील. विहीत नमुन्यातील अर्ज व अधिक माहितीसाठी जिल्हा उद्योग केंद्र परभणी कार्यालयाकडे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे. -*-*-*-*-