• राष्ट्रीय कृषि आणि ग्रामीण विकास बँकेची कार्यशाळा संपन्न परभणी, दि.17(जिमाका) : परभणी जिल्ह्यातील सुमारे 80 टक्के नागरिकांचा व्यवसाय हा कृषि विषयक विविध उद्योगावर अवलंबून असून हा जिल्हा कृषि प्रधान जिल्हा असल्याने जिल्ह्याचा विकास हा कृषि उद्योगाद्वारेच शक्य असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केले. अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नाबार्ड आणि कृषि विभागाच्या विविध योजनाची माहिती देण्यासाठी राष्ट्रीय कृषि आणि ग्रामिण विकास बँक (नाबार्ड) द्वारे आयोजित बँकर्सच्या कार्यशाळेच्या उद्घटनाप्रसंगी श्रीमती आंचल गोयल या बोलत होत्या. यावेळी जिल्हा उपनिबंधीक मंगेश सुरवसे, पशुसंवंर्धन विभागाचे डॉ.प्रल्हाद नेमाडे, लिड बँक व्यवस्थापक सुनिल हट्टेकर, जिल्हा कृषि अधिकारी विजय लोखंडे आणि नाबार्डचे व्यवस्थापक प्रीतम जंगम यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती गोयल म्हणाल्या की, या जिल्ह्यातील शेतजमीन, सिंचन आणि दळण-वळणाची व्यवस्था चांगली आहे. परंतू जिल्ह्यातील अनेक शेतकरी सधन नसल्याने किंवा कृषी विषयक उद्योगासाठी लागणारी यंत्रणा उपलब्ध नसल्याने ते साधारण व पारंपारिक पिकाचे उत्पादन घेतात. यामुळे हा जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांकामध्ये देखील मागे आहे. पंरतू जिल्ह्यातील काही सुशिक्षित नवयुवक हे आता कृषि क्षेत्राकडे आपले लक्ष्य केंद्रीत करत असून कृषि उद्योगावर अधारित नवीन प्रयोग करत आहेत. ही सकारात्मक बाब असून यामुळे जिल्ह्यातील कृषि प्रक्रियेवर अधारित औद्योगिक विकास वाढण्यास नक्कीच मदत होणार आहे. कृषि विभागाच्या पोखरा योजने अंतर्गत इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कृषिवर अधारित प्रक्रिया उद्योग सुरु केले आहेत. परंत परभणी जिल्ह्यातील हे सुरु करण्यासाठी भांडवल नसल्याने ते पुढे येत नाहीत. याचा विचार करुन बँकांनी कर्जाचे प्रकरण मंजूर करावे. तसेच खरिप व रब्बीसाठी शेतकऱ्यांना वेळेवर पिककर्ज मिळणे आवश्यक असून मे-जून पर्यंत खरिपासाठी कर्ज मंजूर करुन वितरण करावे. जेणेकरुन त्यांना वेळेवर पेरणी करता येईल. तसेच जिल्ह्याचा विकास करावयाचा असल्यास बँकांनी शेतकऱ्यांचे दिर्घकालीन मुदतीसाठी कर्ज मंजूर करणे आवश्यक आहे. बँकांनी शेतकऱ्यांचे कर्ज प्रकरणे हे सहानुभूती व मानवतेच्या दृष्टिकोनातून हाताळणे आवश्यक असल्याचे ही जिल्हाधिकारी आंचल गोयल यावेळी म्हणाल्या. जिल्ह्यातील कृषि प्रक्रियेवर आधारित प्रक्रिया उद्योग सुरु करणाऱ्या शेतकरी कंपन्यांना बँकांनी मंजूर केलेल्या कर्जाचे जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यावेळी कार्यशाळेस जिल्ह्यातील सर्व बँकाचे प्रतिनिधी उपस्थित होते. ****