जागतिक आरोग्य संघटनेने सन 1988 मध्ये पोलिओ निर्मूलनाचे ध्येय निश्चित केले आणि त्यानुसार महाराष्ट्रात सन 1995 पासून राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम दरवर्षी राबविण्यात येत आहे. या वर्षी ही मोहिम 27 फेब्रूवारी रोजी राबविण्यात येत आहे. राष्ट्रीय व राज्यस्तरावरील आरोग्य विभागाच्या अथक परिश्रमामुळे व मोहिमेतील सातत्यामुळे देशात व राज्यात पोलिओचे निर्मूलन करण्यास यश प्राप्त होताना दिसत आहे. पोलिओ विषाणूचे तीन प्रकार असून यामध्ये पी 1, पी 2, पी 3 असे प्रकार आढळून येतात. यापैकी पी 2 हा विषाणू जगातून पूर्णपणे नष्ट झाला आहे. जागतिक स्तरावर पोलिओ रुग्णांचा विचार केला तर सन 2004 मध्ये जगामध्ये 1255, भारतात 134, महाराष्ट्रात 3 तर लातूर जिल्ह्यात निरंक अशी संख्या होती. सन 2010 मध्ये अनुक्रमे 897, 41, 5, व 0 सन 2011 मध्ये 620, 1, 0 व 0 तर 2012 मध्ये जगात 193, देशात, राज्यात व जिल्ह्यात निरंक असे पोलिओचे रुग्णांचे प्रमाण आढळून आले. सन 2011 नंतर देशात एक ही पोलिओ रुग्ण आढळून न आल्याने आपल्या देशास 27 मार्च 2014 रोजी पोलिओ निर्मुलन प्रमाणपत्र मिळाले असुन, हे या मोहिमेचे यशच म्हणावे लागेल. तरीही पोलिओ मुक्त महाराष्ट्रासाठी अजुनही सातत्यपूर्ण प्रयत्नांची आवश्यकता आहे. बालकामधील मृत्यू व आजार कमी करण्यासाठी नियमित लसीकरण हे एक प्रभावी साधन आहे. . पोलिओ मुक्त महाराष्ट्रासाठी ही स्थिती आशादायी आहे. सर्व बालकांना प्राथमिक लसीकरण, नियमित एएफपी सर्वेक्षण आणि पल्स पोलिओ लसीकरण मोहिमे अंतर्गत सर्व बालके संरक्षित करणे, या तीन प्रमुख आधारस्तंभावर पोलिओ निर्मूलनाची यशस्वीता अवलंबून आहे. देशात 2011 नंतर एक ही पोलिओ रुग्ण आढळला नसला तरी हीच परिस्थिती कायम राखण्यासाठी आपणांस सतर्क राहणे आवश्यक आहे. या करिता विशेष पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे 27 फेब्रूवारी रोजी आयोजन करण्यात आले असून, पल्स पोलिओ मोहिमेसाठी राज्यपातळीवर सर्व तयारी करण्यात आली आहे. गावाबाहेरील व शहराबाहेरील वस्त्या, भटक्या जमातीची पाडे, साखर कारखाने, बांधकामे व विटभट्या या ठिकाणी काम करणाऱ्या कुटूंबातील बालके, मेंढपाळ, परप्रांतातून आलेली कुटूंबे, धाबे, शेतावरील घरे झोपडपट्ट्यांमधील घरे अशा सर्व स्तरातील शून्य ते पाच वयोगटातील बालकांपर्यत पोहोचण्याची संधी या पल्स पोलिओ मोहिमेद्वारे मिळणार आहे. ही मोहीम यशस्वी होण्यासाठी राज्यामध्ये सुयोग्य नियोजन करुन तयारी करण्यात आली आहे. या मोहिमेचे महत्व सर्व सामान्य जनतेला कळण्यासाठी शहर व ग्रामास्तरावर म्हणी, घोषवाक्ये, पोस्टर, बॅनर या माध्यमाद्वारे प्रसिध्दी करण्यात येत आहे. सर्व बालकांना पोलिओचा डोस उपलब्ध होण्याकरिता ठिकठिकाणी पल्स पोलिओ बूथची व्यवस्था करण्यात आली आहे. याठिकाणी सकाळी आठ वाजल्यापासून ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत बालकांना पोलिओ डोस देण्यात येणार आहे. बसस्थानक, रेल्वे स्टेशन, यात्रा, जत्रा, मंदिर, मशीद, चर्च, उद्याने, मेळावे, टोल नाके यासारख्या ठिकाणी देखील ट्रान्झीट बुथची व्यवस्था बालकांना पोलिओ डोस देण्याकरीता करण्यात आली आहे. याबरोबरच सर्व ठिकाणी दोन कर्मचाऱ्यांची टिम तयार करुन घरोघरी भेट देवून पोलिओ डोस देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. परभणी जिल्ह्याची लोकसंख्या 18 लाख 65 हजार 734 असून शून्य ते पाच वयोगटातील लाभार्थी बालकांची संख्या 2 लाख 11 हजार 432 आहे. जिल्ह्यातील सर्वच बूथवर 100 टक्के पोलिओ लसीकरण होण्याकरीता जिल्हा प्रशासनाने नियोजन केले आहे. याकरिता 3 कर्मचाऱ्यांचे 987 बुथ व 2 कर्मचाऱ्यांचे 566 असे एकूण 1 हजार 553 बूथ या मोहिमेत कार्यरत राहणार आहे. 27 फेब्रूवारी रोजीच्या मोहिमेतून वंचित राहिलेल्या बालकांनाही पल्स पोलिओची लस देण्याकरीता ग्रामीण भागात 1 ते 8 मार्च तर शहरी भागात 1 ते 5 मार्च दरम्यान पुन्हा मोहीम राबविण्यात येणार आहे. सर्व स्तरातील पालकांनी पल्स पोलिओ मोहिमेचा लाभ घेण्यासाठी 27 फेब्रूवारी रोजी आपल्या शून्य ते पाच वयोगटातील बालकांना पोलिओ डोस देण्याकरिता पल्स पोलिओ बूथ केंद्रावर घेऊन जावे. मागील अठरा वर्ष आपण सर्वजण या प्रकारची मोहीम यशस्वीपणे राबवित आहोत हे निश्चितच कौतुकास्पद आहे. मात्र, एवढ्यावर समाधान मानून चालणार नाही. ही निरंतर चालणारी प्रक्रिया असुन त्याअनुषंगाने याच प्रकारे या वर्षी देखील आपला महाराष्ट्र पोलिओ मुक्त करण्याकरिता नव्या दमाने कटिबध्द होऊन प्रतिज्ञा करु या ! आपल्या बालकास अपंगत्वापासून वाचविण्यासाठी सर्वांना पोलिओ लस वरदान आहे, याचा विसर पडता कामा नये. बालकाच्या सुदृढ आरोग्यासाठी पल्स पोलिओ लसीकरण अत्यंत महत्वाचे आहे. अरुण सुर्यवंशी जिल्हा माहिती कार्यालय परभणी **** (टिप : सदर लेख दि. 27 फेब्रूवारी, 2022 च्या अंकात प्रसिध्द करावा )