* परभणी,दि.27(जिमाका): मागील पाच वर्षात मराठवाड्यातील रस्ते कामांकडे फार दूर्लक्ष झाले असुन, मराठवाड्याला याकरीता निधीच उपलब्ध होत नव्हता. सुदैवाने ही संधी मराठवाड्याकडे आल्याने तसेच मराठवाड्याचा भूमिपुत्र म्हणून मराठवाड्यातील प्रलंबित कामाचा अनुशेष भरुन काढण्याचा प्रयत्न करण्यात येईल असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केले. परभणी तालुक्यातील जांब येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे लोकार्पण, जिल्हा परिषद शाळेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन आणि नाबार्ड 36 अंतर्गत बाभूळगाव ते मांडाखळी ग्रामीण रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी श्री. अशोक चव्हाण हे बोलत होते. यावेळी खासदार संजय जाधव, सर्वश्री आमदार सुरेश वरपुडकर, डॉ. राहुल पाटील, बाबाजानी दुर्रानी, सुरेशदादा देशमुख, राजेश विटेकर, तुकाराम रेंगे पाटील, सुरेश नागरे जिल्हाधिकारी आंचल गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी श्री. अशोक चव्हाण पुढे म्हणाले की, लोकप्रतिनिधीनी अधिक लक्ष देवून आपल्या मतदार संघातील जेवढ्या शाळा चांगल्या करता येतील तेवढ्या चांगल्या कराव्यात. याशाळा करीता निधी डिपीसी, आमदार निधी किंवा अन्य मार्गाने उपलब्ध करुन दिला पाहिजे. कारण मराठवाड्यामध्ये या गोष्टींची कमतरता आहे. रस्त्यांचे विषय आहेत. मला याठिकाणी सांगताना आनंद होत आहे, परभणी शहराकरीता 80 कोटी रुपयांचे रस्त्याकरीता मी आज मंजूरी देत असून त्याचे भूमिपूजन आज होत आहे. मागील पाच वर्षात मराठवाड्यातील रस्त्त्यांकडे फार दूर्लक्ष झाले होते. मराठवाड्याला याकरीता निधीच उपलब्ध होत नव्हता. सुदैवाने ही संधी मराठवाड्याकडे आली आहे. यामुळे मराठवाड्यातील कोणताही प्रस्ताव आल्यास त्यास मंजूरी देण्याचे काम करीत आहे. अनेक वर्षापासूनचा जो आपला अनुशेष आहे तो पूर्ण झाला पाहिजे. हा अनुशेष दूर करुन जे महत्वाचे रस्ते आहेत, ते रस्ते अतिशय चांगल्या पध्दतीन करण्याचा प्रयत्न आपल्या करायचा आहे. मराठवाड्याच्या आठही जिल्ह्याला जेवढे झुकते माप देता येईल तेवढा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मी मा. मुख्यमंत्र्याना विनंती केली समृध्दी महामार्ग हा जालना मार्गे बूलढाण्यामधून मराठवाडा सोडून बाहेरून जात आहे. आज मुंबईला जाण्यासाठी बारा तास लागतात, अशी मराठवाड्याची आवस्था आहे. म्हणुन मा. मुख्यमंत्री यांच्याकडे जालना, परभणी आणि नांदेड या जिल्ह्यांना समृध्दी महामार्गाला जोडण्याकरीताचा निर्णय घेण्याची विनंती केली. आणि सदर विनंती मान्य करुन या तिन्ही जिल्ह्यांना जोडण्याकरीता 13 हजार कोटी रुपयांचा महामार्ग मंजूर झाला. हा महामार्ग तयार झाल्यानंतर आपण औरंगाबाला दोन तासात तर मुंबईला सहा तासात पोहचू अशा प्रकारचा समृध्दी महामार्ग मराठवाड्यासाठी तयार करत आहोत. याकरीता भूसंपादनाची कार्यवाही सुरु झाली आहे. 13 हजार कोटीसाठी 1 हाजर कोटीची तरतुद भूसंपादानासाठी करण्यात आली असून भूसंपादनाची कार्यवाही सुरु झालेली आहे. मराठवाड्यासाठी आणखी एक प्रस्ताव करण्याचा प्रयत्न सुरु असून लातूरला जायचे असेल तसेच लातूरहून परभणीला यायचे असेल यासाठी पाच तास लागतात. 100 कि.मी. अंतरासाठी 200 कि.मी. फिरुन यावे लागते. याकरीता आमचा प्रयत्न आहे की परभणी-नांदेड जोडलेले आहे परंतू नांदेड-लातूर हे जोडले गेल्यास नांदेड-लातूर एक तासात तर परभणी-लातूर दोन तासात पोहचू शकू असा आमचा प्रयत्न सुरु आहे. जेणेकरुन पुण्याला सहा-सात तासा पोहचू शकू यासाठी आमचा प्रयत्न सुरु आहे. यासाठी 50 टक्के राज्य शासनाचा आणि 50 टक्के केंद्र शासनाचा निधी उपलब्ध करुन घेवू असा प्रस्ताव मा. मुख्यमंत्र्याकडे सादर केला अहे. हा सुमारे चार हजार कोटीचा प्रकल्प होणार असून हा मार्ग झाल्यास या तिन्ही जिल्ह्यास खुप चांगला फायदा होणार आहे. हे दोन्ही महत्वकांक्षी प्रकल्पासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. गतवर्षी मध्ये आपल्या परभणी,पारवा, जांब, पेडगाव या ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी 19 कोटी मंजूर करण्यात आले. ग्रामीण रस्ता जिल्हा परिषदेकडे असून यासाठी जिल्हा परिषदेला निधी कमी उपलब्ध होतो. याकरीता हा जो ग्रामीण मार्ग आहे त्यास जर प्रमुख जिल्हा मार्ग घोषीत केल्यास त्यास सार्वजनीक बांधकाम विभागामार्फत निधी उपलब्ध करुन देता येईल अशी मागणी करण्यात आली असून याचा नक्की विचार करुण्यात येईल. मराठवाड्यामधील ग्रामीण भागातील दळणवळणाची सुविधा सुरळीत व्हावी यासाठी ग्रामीण रस्ते सुधारण्यावर राज्य शासना प्रयत्न करीत असुन मराठवाडा ग्रामीण भागातील दळणवळणाची सुविधा सुरळीत व्हावी यासाठी ग्रामीण रस्ते सुधारण्यावर राज्य शासन प्रयत्न करीत असल्याचे ही सार्वजनीक बांधकाम मंत्री श्री. अशोक चव्हाण यावेळी म्हणाले. जांब येथील प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण भागातील लोकांसाठी वरदान ठरणार आहे. यामाध्यमातून नागरिकांना चांगल्या आरोग्य सेवा द्यावी जेणेकरून त्यांचे समाधान होईल. मराठवाड्याची अवस्था पाहता आपल्या परभणी जिल्ह्यात चांगल्या इमारती उभ्या करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी अधिकाधिक प्रयत्न करावेत. कोरोनाने माणसाला जीवन आणि आरोग्य सेवा या दोन गोष्टीचे महत्त्व पटवून दिले. संसर्गजन्य रोगाच्या परिस्थितीत आरोग्य सुविधा व रुग्णालय कमी पडतात म्हणून ज्याठिकाणी ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्राची गरज आहे. तेथील कामे जिल्हा नियोजन समिती निधीतून करून मोफत व दर्जेदार आरोग्य सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. कोरोनाच्या कालावधीत महाराष्ट्राने ऑक्सिजन निर्मिती करून ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत केला. त्यामुळे मराठवाड्यातील लोक सुखरुप कोरोनातून बाहेर पडले. सद्यस्थितीतही कोरोनाची नियमावली पाळणे गरजेचे आहे असेही यावेळी सार्वजनीक बांधकाम श्री. अशोक चव्हाण म्हणाले. यावेळी कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. ****
Maharshtra News, Parbhani News