परभणी दि.20,(जिमाका) : ॲनिमल राहत सांगली व महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन खाते जिल्हा परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने परभणी जिल्ह्यातील तज्ञ पशुवैद्यकांना बैलामधील वेदनारहीत खच्चीकरणाचा प्रशिक्षण कार्यक्रम दि.16 सप्टेंबर 2021 रोजी पशुवैद्यकिय दवाखाना श्रेणी-1 परभणी येथे संपन्न झाला. प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त डॉ.संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला. प्रशिक्षणासाठी जिल्ह्यातील पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त, पशुधन विकास अधिकारी आणि पशुवैद्यकिय दवाखाना श्रेणी-1 चे पशुधन विकास अधिकारी उपस्थित होते. वेदनारहित खच्चीकरणाची पध्दत पशुसंवर्धन विभागाच्या पशुवैद्यकांना प्रगत पध्दती व मानवी पध्दतीचा अवलंब करण्याचा उद्देश साध्य करण्यासाठी हितकारक ठरेल आणि कोणताही पशु हिंसक प्रक्रियेला भविष्यात सामोरे जाणार नाही याची पशुसंवर्धन विभागाकडून दक्षता घेण्यात येईल तसेच पशुंना वेदनारहित करणे हाच प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश होता. या प्रशिक्षणासाठी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ.आर.ए.कल्यापुरे, यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पशुधन विकास अधिकारी डॉ.प्रकाश सावणे, ॲनिमल राहतचे डॉ.चेतन यादव, क्लिनिकल क्वॉलिटी ॲश्युरन्स मॅनेजर व वरिष्ठ प्राणी कल्याण अधिकारी सुनिल हवालदार यांनी परिश्रम घेतले. असेही कळविण्यात आले आहे. -*-*-*-*-