मराठवाड्याच्या विकासाची कामे तातडीने मार्गी लावू – सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण परभणी, दि.9 (जिमाका):- मागील बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असलेले गंगाखेड शहराच्या वैभवात भर टाकणारे रेल्वेच्या उड्डाणपुलाचे काम पूर्ण होवून लोकार्पण करताना मनस्वी आनंद होत आहे. विशेषतः मराठवाड्यातील विकासाच्या कामासंदर्भात कुठलाही भेदभाव न करता विकासाची कामे तातडीने मार्गी लावू असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केले. गंगाखेड येथील रेल्वे उड्डाण पुलाचा लोकार्पण सोहळा कोविड नियमांचे पालन करून रविवार दि. 9 जानेवारी 2022 रोजी पार पडला. यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार संजय जाधव, आमदार बाबाजानी दुर्रानी, आमदार सुरेश वरपुडकर, आमदार रत्नाकर गुट्टे, आमदार राहुल पाटील, आमदार अमरनाथ राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, माजी खासदार तुकाराम रेंगे, माजी आमदार डॉ.मधुसूदन केंद्रे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, कार्यकारी अभियंता प्रदीप व्हटकर आदींची उपस्थिती होती. सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. चव्हाण म्हणाले की, सार्वजनिक बांधकाम विभागाचा कार्यभार हाताळत असताना मराठवाड्यातील कामांचा अनुशेष भरून काढण्यावर माझा भर आहे. परभणी जिल्ह्याला विशेष प्राधान्य देऊन जिल्ह्यात अंदाजे 41 कोटीची 455 कामे प्रगतीपथावर असून लवकरच ती पूर्ण होणार आहेत. जिल्ह्यातील विकासाची प्रलंबित कामे निश्चित मार्गी लावणार असून पालम ते फळा, रावराजुर ते वझूर, गंगाखेड तालुक्यातील कवडगाव, सायाळा- सुनेगाव या ठिकाणच्या विकास कामांचे प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने पाठवावेत म्हणजे त्यास मंजुरी देऊन ते काम लवकरच सुरु करण्यात येतील. असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. तसेच नवीन कामे यंदाच्या अर्थसंकल्पात घेऊन ती पूर्ण करण्यावर माझा भर राहील. परभणी जिल्ह्याच्या विकासाची नवनवीन कामे हाती घेऊन ती पूर्ण करण्यात येतील. असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. यावेळी खासदार संजय जाधव, आमदार रत्नाकर गुट्टे आणि आमदार बाबाजानी दुर्रानी यांची समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधिक्षक अभियंता अविनाश धोंडगे यांनी केले. कोविड नियमांचे पालन करून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास नागरिक, शेतकरी, पत्रकार, पदाधिकारी व संबंधित विभागाचे अधिकारी यांची उपस्थिती होती. -*-*-*-*-